Blog Detail

जेष्टागौरी पुजन

जेष्टागौरी पुजन:-आपल्या कुटुंबातील सर्वांना सुख समाधान, सौख्य समृद्ध व भरभराटीसाठी विविध पुजा,व्रते व संकल्प करण्याची गृहलक्ष्मीची भारतात शेकडो वर्षापासूनची चालू असलेली जुनी परंपरा आज ही तेवढ्याच उत्साहात आनंदाने जेष्ठा गौरीचा सण साजरी करून जपली जात आहे. अग्निपुराणात या सणा बाबत माहिती आलेली आहे हे महत्त्वाचे.गणपती उत्सवातच गौरीचे आगमण व विसर्जन होत असते.गौरी जरी पार्वतीचा अवतार असला तरी गौरी या गणपती नंतर येतात म्हणून काही जण गणपती व गौरीचे हे नाते बहिण भाऊ समान मानतात.गौरीचे आगमन हे जेष्ठा नक्षत्रावरती होत असते, अनुराधा नक्षत्रावरती तिचे पुजन केले जाते तर मुळ नक्षत्रावरती तिचे विसर्जन केले जात असते. हा सण भारतात खासकरून महाराष्ट्रात वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. यात काही ठिकाणी बैठ्या तर काही ठिकाणी उभ्या गौरी केल्या असतात.पौराणिक कथेनुसार देवतांना दानवां कडून खूप त्रास होत होता. देवतांच्या पत्नींनी आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे म्हणून महालक्ष्मीची आराधना केली पुजा अर्चा केली प्रार्थना केली लक्ष्मीने देवतांवरती आलेले संकट दूर केले. याप्रसंगाची आठवण म्हणून हा सण आपल्या कडे 3 दिवस मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो. आपले सौभाग्य अखंड रहावे,घरात अन्न धान्य व संपत्ती कमी पडू नये ही भावना व हेतू हा सण साजरी करण्यामागे असतो.आमच्या कडे सर्व साधारणपणे घरात व घराबाहेर हळदीकुंकुचा सडा टाकून रांगोळीची लक्ष्मीची पावलांची ठसे काढली जातात. मोठ्या परातीत किंवा सुपात खण तांदुळात गौरीचे दोन्ही मुखवटे व  पिलवंडीचेही मुखवटे ठेवून घराच्याबाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या तुळशीवृंदावनापासी सुवासिनी बायका गौरीची पुजा व आरती करून गौरी कशाच्या पाऊली आली सोन्या-मोत्याच्या अन्न धान्याच्या पाऊली असे म्हणत  घरात आणल्या जातात.यावेळी घराच्या उंबरठ्यावरती भरल्या धान्याचे मापे लवंडून आत गौरी आणल्या जातात. यावेळी लहान मुले ताट चमचे वाजवत आनंदी वातावरणात गौरीचे घरात आगमण होते. पहिल्या दिवशी दुर्वा पान फुले वाहून आंबाडा,शेपू किंवा मेथीची भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जात असे.दुस-या दिवशी गौरीला हार वेणी घातले जाते, केळीच्या पानावरती 16भाज्या अनेक प्रकारच्या चटण्या कोशिंबीर पुरणपोळी अशा अनेक पक्वान्ने गौरीची पुजा करून खाऊ घातले जातात.गौरी समोर अनेक प्रकारचे फराळाचे वस्तू ठेवल्या जातात त्याच बरोबर अनेक प्रकारचे फळे ही ठेवले जातात हे सर्व करण्या मागे आपल्याला काही कमी पडू नये ही भावना असते. तिस-या दिवशी साधे जेवण करून गौरीचे मूळ नक्षत्रावरती विसर्जन होत असते. असा प्रकारे माहेरवाशीण गौरी आपल्या घरी येते, राहते व डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते अशी ही गौरी माता.